पुणे – संघटीतपणे जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरणासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या सार्थक मिसाळ टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. टोळक्याने पंधरा दिवसांपुर्वी आंबेगाव परिसरात लोखंडी कोयत्याने वार करून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करून परिसरातील वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सार्थक संगीत मिसाळ (२०, नऱ्हेगाव), अजय उर्पâ शुभम रविंद्र हिरे (२३, आंबेगाव), तुकाराम रामचंद्र येनपुरे उर्फ वस्ताद (५२, आंबेगाव) यांच्यासह एकूण आठ जणांवर ही कारवाई करण्यात आली. सार्थक मिसाळ टोळीवर २०२० पासून संघटीतपणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. टोळीचा प्रमुख मिसाळ याने प्रत्येक गुन्ह्याचे वेळी वेगवेगळे साथीदार सोबत घेऊन स्वतःच्या टोळीची दहशत निर्माण करण्याकरीता दरोडा, अपहरण, खूनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे केलेले आहेत.
त्यांचेवर यापुर्वी प्रतिबंधक कारवाई तसेच हद्दपारी सारखी ठोस कारवाई करण्यात आली होती. परंतु तरीदेखील त्यांच्या वर्तनात फरक पडला नाही. २२ ऑगस्ट रोजी मिसाळ टोळीने आंबेगाव परिसरात एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींना अटक केली. आरोपींच्या वर्तनात सूधारणा होत नसल्याने त्यांच्यावर ठोेस कारवाई म्हणून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी मिसाळ टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला वरिष्ठ अधिकाऱ्याने मंजूरी दिली.