मुंबईतील उपनगर साकीनाका (Mumbai Sakinaka Rape Case) येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल (शुक्रवारी) समोर आली होती. दुर्दैवाने पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेसंदर्भात आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी एसपी ज्योत्स्ना रासम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांना एक महिन्याचा वेळ देण्यात आला असून ज्योत्स्ना रासम यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. या अनुशंगाने ज्योत्स्ना रासम यांच्याबद्दल जाणून घेऊया.
ज्योत्स्ना रासम यांनी आतापर्यंत अनेक महत्वाच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. यात मुद्रांक घोटाळ्यातील तपास, अभिनेत्री रेश्मा ऊर्फ लैला खान हिच्या हत्या प्रकरण, 2011 साली हैदराबादहून मुंबईला तस्करी करण्यात आलेले 1 कोटी 45 लाख किमतीचे हिरे आणि सोन्याचा मुद्देमाल आरोपींसह हस्तगत करणं, दुबईच्या रोशन अन्सारीच्या मुसक्या आवळणे, विशेष म्हणजे राणी मुखर्जीला ‘मर्दानी’ चित्रपटासाठी ज्योत्स्ना रासम यांनी ट्रेनिंग दिलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणात तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवून घेण्याचं कामही त्यांनी केलं होतं.
ज्योत्स्ना रासम यांना खेळाचीही खूप आवड आहे. भ्रूणहत्येच्या विरोधात त्यांनी 11 दिवसांत 13 राज्यांमध्ये 6580 किलोमीटर प्रवास चारचाकी वाहनाने प्रवास केला. यावेळी कमी वेळात सर्वात वेगाने प्रवास करणारी महिला म्हणून त्यांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
रासम या 27 वर्षांपूर्वी पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर दाखल झाल्या होत्या. आज सहायक आयुक्त म्हणून राज्य गुप्तचर विभागात कार्यरत आहेत. इतक्या वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल यशस्वी केली आहे.
ज्योत्स्ना रासम चांगल्या गिर्यारोहक आहेत. त्यांनी अनेक उंच शिखरं आतापर्यंत पादक्रांत केली आहेत. यात 1991 मध्ये हनुमान तिब्बा (19450 फूट), शितीधर (17340 फूट) आणि फ्रेंडशिप (17100 फूट) ही तीन शिखरं यांनी चढली आहेत.
ज्योत्स्ना रासम यांनी राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ चित्रपटासासाठी राणी ट्रेनिंग दिलं होतं. तेव्हा ज्योत्स्ना या गुन्हे शाखेच्या कक्ष 8 मध्ये कार्यरत होत्या. त्यावेळी राणीला त्यांनी गुन्हेगारी तपासाचे धडे गिरवायला शिवकले.
ज्योत्स्ना रासम यांचं मूळ गाव राजापूर आहे. पण, त्यांचा जन्म मुंबईत झाला असून इथचं त्यांचं आयुष्य गेलं आहे. वांद्रे येथील गांधीनगर परिसरात रहाणाऱ्या ज्योत्स्ना यांचे न्यू इंग्लिश स्कूल, नंतर चेतना महाविद्यालय इथं शिक्षण झालं. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय, वडील छापखान्यात कामाला होते, तर आई घर सांभाळायची; पण खाण्यापिण्यापासून शिक्षणापर्यंत आईवडिलांनी कधीही आबाळ होऊ दिली नाही, असे त्या सांगतात.