नगर – कल्याण तहसील कार्यालयात 1 लाख २० हजारांची लाच घेताना तहसीलदार व त्यांच्या शिपायाला लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच नगर जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात जमिनीची मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या.
जमिनीची मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच स्वीकारताना शिरुर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक प्रशांत मोहन कांबळे (भूकरमापक वर्ग-3) याला पकडले. कार्यालयाच्या आवारात पथकाने ही कारवाई केली आहे.
याप्रकरणी कांबळे याच्या विरुद्ध लाचलुपत प्रतिबंधक कायद्यानुसार शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी शिरुर येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी आरोपी प्रशांत कांबळे याने त्यांच्याकडे जमीन मोजणी करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मोबदला म्हणून मागणी केली होती.
दरम्यान तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. यामध्ये आरोपी कांबळे एसीबीच्या जाळ्यात सापडला.