फोटो : बनावट कॉल सेंटर चालविणार्या संशयितांसह पोलीस निरीक्षक विश्वेश कर्पे, राहुल परब व पोलीस पथक.
म्हापसा : तेमवाडा मोरजी येथून अमेरिकेतील नागरिकांना सोशल सेक्युरिटी कार्ड व कर्जाचे आमिष दाखवून लुटणार्या बनावट कॉल सेंटरचा बुधवारी पर्दाफाश करण्यात आला. गोवा पोलिसांची गुन्हा शाखा व सायबर गुन्हा शाखा यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या सेंटरचे मुख्य सूत्रधार दिग्विजय राजपूत (रा. गुजरात) यांच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली आहे. ऑनलाईन लूटमारी करणारी टोळी गजाआड करण्याची गोव्यातील ही पहिलीच कारवाई आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी दिग्विजय दिलीपसिंह राजपूत (३२, रा. अहमदाबाद, गुजरात), धनपाल रामनिवास सैनी (३०, रा. जयपूर, राजस्थान), साजिद मुश्ताक अहमद (२६, रा. ठाणे, मुंबई), राघव कृष्ण राजन उपाध्याय (२४, रा. बोरीवली, मुंबई), फेनिल हरीशभाई पटेल (२६, रा. ठाणे), शैलेश पंकज बक्षी (२१, रा. नवी दिल्ली), आकाश हितेश लखा (२५, रा. बोरीवली मुंबई), जेब्रन रिझवान शेख (३१, रा. ठाणे), सत्यम मनोज कुमार (२१, देवनगर, दिल्ली), मुजफ्फर शमशुद्दीन शेख (२७, रा. कांदिवली मुंबई), सुमिया विजय सिंग (२७, रा. शिलाँग), जोन्स कार्दोज (४२, असोळना, सासष्टी), शाबाझ सिराज शेख (२५, रा. मलाड मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीतील दुसरा सूत्रधार कृणाल शर्मा फरारी आहे.
तेमवाडा मोरजी येथे समुद्रकिनारी इडम गार्डन हॉटेलमध्ये बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल परब यांना मिळाली होती. त्याआधारे क्राईम ब्रँच व सायबर क्राईमच्या पथकाने सदर हॉटेलवर छापा मारला. पोलिसांना हॉटेलच्या तीन खोल्यांमध्ये बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचे आढळून आले. या सेंटरमधून संशयित अमेरिकेतील नागरिकांना डार्कनेटच्या साहाय्याने लुबाडत होते. पोलिसांनी सेंटरमधील ११ संगणक, एक सर्व्हर लॅपटॉप, राऊटर, स्वीच बॉक्स, मोबाईल फोन, तसेच विनावापरातील संगणक, टेबल व खुर्च्या जप्त केल्या.
सायबर क्राईम शाखेने संशयितांविरुद्ध भा.दं.सं.च्या ४१९, ४२०, ३८४ व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क) व ६६(ड) नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल परब, नारायण चिमुलकर, विश्वेश कर्पे, उपनिरीक्षक सर्वेश सावंत, देवेंद्र पिंगळे, हवालदार इर्शाद वाटांगी, उमेश देसाई, कॉन्स्टेबल महाबळेशवर सावंत, सईमुल्ला मकानदार, कल्पेश तोरस्कर, व नझिर सय्यद या पथकाने केली.
गोड बोलून, आमिषे दाखवून लुटण्याचा धंदा
कॉल सेंटरमधून संशयित अमेरिकेतील लोकांशी सपर्क साधत होते. आपण सोशल सेक्युरिटी प्रशासनमधून बोलतो आहे. आपले सोशल सेक्युरिटी कार्ड बंद व्हायचे आहे. त्यामुळे त्या कार्डशी निगडित आपली सर्व खाती बंद होतील. तुम्हाला यात काही चर्चा करायची असल्यास मी माझ्या अधिकार्यांसोबत बोलतो. या मदतीसाठी मला पाचशे डॉलरचे गिफ्ट कार्ड, टार्गेट कार्ड किंवा गुगल पे असे डार्कनेटने पाठवावे. शिवाय तुम्हाला आमची बँक कर्ज देण्यास तयार आहे. हे कर्ज आपण वेळेत फेडणार याच्या हमीसाठी प्रथम आमचा ५०० डॉलरचा हफ्ता भरून दाखवा, असे सांगून ते नागरिकांना लुटत होते.
हॉटेलच्या तळमजल्यावर जेवणाची व्यवस्था, पहिल्या मजल्यावर कॉल सेंटर, दुसर्या व तिसर्या मजल्यावर राहण्याची व्यवस्था होती. पहिल्या मजल्यावर सेंटरचे ३२ केबिन बनविले होते. त्यांतील ११ केबिन वापरात होते. आवश्यक कर्मचारी नियुक्त करून एका महिन्यात सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा संशयितांचा बेत होता.
गंडा घालण्याच्या कुवतीप्रमाणे मोबदला
बनावट कॉल सेंटर चालविण्यासाठी लागणारे अमेरिकेतील नागरिकांचे फोन क्रमांक संशयित एखाद्या कंपनीकडून बेकायदेशीररीत्या विकत घेत होते. हे मोबाईल क्रमांकावर ते कामगारांच्या मदतीने संपर्क साधून नागरिकांना लुटत होते. त्यासाठी कामगारांना गंडा घालण्याच्या कुवतीप्रमाणे मोबदला दिला जात होता. दहापैकी दोघे संशयितांच्या जाळ्यात अडकत जात होते, अशी माहिती चौकशीतून निष्पन्न झाली आहे.